सोलापूर,दि.3: सोलापूर येथील समाज कल्याण विभाग येथे कार्यरत असलेले शिपाई किसन मारुती भोसले व अशोक गेमू जाधव या शिपायांनी तक्रारदाराच्या पत्नीचा सन 2014 ते 2019 या कालावधीतील थकीत वेतन अदा केल्याबद्दल त्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे रक्कम रुपये सात लाखाची लाचेची मागणी केली म्हणून तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत विभागाकडे आरोपी किसन भोसले व अशोक जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती.
लाच प्रकरण | पाच लाखांची मागणी
त्यानुसार दि. 01/09/2022 रोजी तक्रारदाराकडून त्याच्या पत्नीचे थकीत वेतन पूर्वीच अदा केले म्हणून त्याचा मोबदला म्हणून रक्कम रू. 5,00,000/- ची लाचेची मागणी केल्याचे सोलापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणीत निष्पन्न झाल्यानंतर आरोपींविरुद्ध पुढील सापळा रचण्यात आलेला होता. परंतु आरोपींनी तक्रारदाराकडे पुन्हा लाचेची मागणी केली नाही अथवा स्वीकारली नाही.
लाच प्रकरणात अशोक जाधव यांना अटक
त्यानंतर यातील आरोपी अशोक जाधव यांना दि. 26/12/2022 रोजी अटक करण्यात आलेली होती व दुसरा आरोपी किसन भोसले हा पळून गेलेला होता. त्यामुळे दोन्ही आरोपीच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये लाच मागितल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर प्रकरणात सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी आरोपी अशोक गेमू जाधव यांची रक्कम रुपये 25000/- च्या जामिनावर मुक्तता केली.
यात अटक आरोपी अशोक गेमू जाधव याच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओंकार परदेशी, ॲड. सोनाली कोंडा, ॲड. लता कॅरमकोंडा यांनी काम पाहिले.