कणकवली,दि.२१: Osargaon Accident: मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) लक्झरी बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बसला (क्रमांक एम.एच.१२ के.क्यू.५७६९) आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लक्झरी मधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Osargaon Accident: बस जळून खाक
आग विजविण्यासाठी नगरपंचायत कणकवलीचा अग्निशमन बंब बोलविण्यात आला. मात्र तत्पूर्वी बस जळून खाक झाली होती. महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प
या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत कार्य केले. कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला तत्काळ पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थानीही मदतकार्य केले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी ती वाहतूक सुरळीत केली.