मुंबई,दि.17: मुंबईकरांनी मविआची ताकद पाहिली आहे. आज मविआचा (महाविकास आघाडी) मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे. मुंबईच्या रस्त्यावर आज भगवा, हिरवा, लाल आणि पांढरे झेंडे घेऊन लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. महाविकास आघाडीचा अभुतपूर्व असा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रमुख नेते सामील झाले होते. या मोर्चाच्या समारोपाच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा सामील झाले.
महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार: उद्धव ठाकरे
कर्नाटक असो वा आणखी इतर शक्ती असो, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत, महाराष्ट्राचे लचके तोडत आहेत, त्यामुळे या महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार असा निश्चय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आजचा महामोर्चा हा त्याचाच भाग असून हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे असंही ते म्हणाले.
बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला
महामोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. ज्या वेळी या मोर्चाची घोषणा केली त्यावेळी तुम्ही चालणार का असा सवाल मला करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्या छाताडावर चालणार असल्याचं मी म्हणालो. मुंबईसह महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही.

मोर्चामध्ये महाराष्ट्रद्रोही नाहीत
आजच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रप्रेमी सामील झाल्याचं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच्या मोर्चात महाराष्ट्रद्रोही सामील झालेले नाहीत. बाळासाहेबांचे विचार घेऊन जातोय असं म्हणणारं तोतया या मोर्चामध्ये नाहीत.राज्यपाल पद मोठं आहे, त्याचा आम्ही मान ठेवतो. पण राज्यपाल कोण असावा याचा विचार करावा. राज्यपाल महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करतात. त्यावर राज्याचे मंत्री महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई नसत्या तर आज या मंत्र्यासारखे वैचारिक दारिद्र आले असते.
मंत्रिमंडळात वैचारिक दारिद्र असणारे मंत्री
राज्यातील सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आज एक तर वैचारिक दारिद्र असणारे किंवा महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मंत्री आहेत. मुंबईच्या पालकमंत्र्यांनी खोकेवाल्या सरकारची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेसोबत केली. चंद्रकांत पाटलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. एका मंत्र्याने सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. आता मुंबईचे लचके तोडले जात आहेत. अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळवले जात आहेत. आम्ही सत्तेत असताना अनेक प्रकल्प सुरु केले. पण यांनी बंद केले. सध्याचे मुंबईचे पालकमंत्री स्केअर फुटमध्ये बोलतात.