दि.19: चीनमध्ये (Uighur Muslims) उइघर मुस्लिमांचा किती अमानुष छळ होतोय हे एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे जगापुढे आलं आहे. आपल्या क्रूरतेसाठी तालिबानी जगभरात कुप्रसिद्ध आहेत; पण सध्या चीन सरकार आपल्या देशातील उईगर मुस्लिमांना (Uighur Muslims in China) देत असणारी वागणूक ही तालिबान्यांपेक्षाही क्रूर आहे. सरकारचं न ऐकणाऱ्या उईगरांना शिन्जियांगमधील डीटेन्शन सेंटरमध्ये टाकण्यात येत आहे. याठिकाणी त्यांचा अमानुष छळ केला जात आहे. यापूर्वी कित्येक उईगर मुस्लिमांनी आपल्या साथीदारांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत सांगितलं होतं; मात्र आता पहिल्यांदाच चीनमधल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
दी मेल या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चीनमधल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिन्जियांगमध्ये ठेवण्यात आलेल्या उईगर मुस्लिमांना सर्वांत आधी खुर्चीला बांधण्यात येतं. यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यात येते. त्यांना लाथा-बुक्क्यांनी आणि चाबकाच्या फटक्यांनी मारलं जातं. कित्येक जणांचा या मारहाणीमध्ये मृत्यू होतो.
पोलिसांचा अत्याचार इथेच थांबत नाही. इथे पकडून ठेवलेल्या सर्वांना एक क्षणही झोपू दिलं जात नाही. कोणी अगदी थोडंही झोपलेलं आढळलं, तर त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात मारहाण केली जाते. कित्येक जण या मारहाणीत आपली दृष्टीही गमावतात. मारहाणीमध्ये बेशुद्ध पडलेल्यांना तसंच सोडून दिलं जातं आणि शुद्धीवर आल्यानंतर त्यांना पुन्हा मारहाण केली जाते. कित्येक पोलीस अधिकारी चक्क हातोड्याने या लोकांचे पायही तोडून टाकतात. यामुळे त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येतं. शिवाय, यातलं कोणी पळून जाऊ नये, यासाठी त्यांना टॉयलेटलाही जाण्यास परवानगी दिली जात नाही.
चीनने शिन्जियांग प्रांतातल्या मुस्लिमांवर कित्येक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. मुस्लिमांनी हा प्रांत सोडण्याचा प्रयत्न केल्यास किंवा आपली गरिबी जाहीर केल्यास त्यांची रवानगी थेट डिटेन्शन सेंटरमध्ये करण्यात येत आहे. या प्रांतातून मुस्लिमांनी पळून जाऊ नये यासाठी प्रत्येक 300 ते 500 पावलांवर चेकपॉइंट उभारण्यात आले आहेत.
या ठिकाणी लांब दाढीवाल्या कोणालाही अडवून तपासण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. तसंच, तीन उईगर मुस्लिम एकत्र जाताना दिसले, तर पोलीस त्यांना अडवून एकेकटं जाण्यास सांगतात. सोशल मीडियाच्या वापरावरही चीननं बंधनं लादली आहेत. एखादा इस्लामिक व्हिडिओ शेअर केल्यास तब्बल दहा वर्षं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे.
शिन्जियांगमधला छळ एवढ्यावरच संपत नाही. इथे डांबून ठेवण्यात आलेल्या कित्येकांना गुप्तांगावर शॉक दिला जातो. तसंच, महिलांना एका वेगळ्या प्रकारची शिक्षा दिली जाते. महिलांच्या हातामध्ये हातकडी घालण्यात येते, त्यानंतर त्यांचे हात टेबलावर जोर जोरात आपटण्यात येतात. जोपर्यंत त्यांचे हात रक्तबंबाळ होत नाहीत, तोपर्यंत ही शिक्षा सुरू राहते. माहिती देणाऱ्या पोलिसानं सांगितलं, की त्याने अगदी 14 वर्षांच्या मुलांनाही अशाच प्रकारची वागणूक दिली गेल्याचं पाहिलं आहे. या मुलांचा गुन्हा फक्त एवढाच आहे, की त्यांनी मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म घेतला!