मुंबई,दि.5: Uddhav Thackeray Prakash Ambedkar | उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक संपली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अशा प्रकारची बैठक होणार नसल्याचे म्हटले होते. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये झालेल्या भेटीबाबत प्रचंड गोपनीयता ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र माध्यमांना या भेटीची माहिती मिळाल्याने भेटीबाबत गुप्तता बाळगण्याचा ठाकरे-आंबेडकरांचा प्रयत्न फसला.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आले होते एकत्र
खरंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीररित्या एका मंचावर आले होते. असं असतानाही दोन्ही नेत्यांनी आजच्या भेटीबाबतची माहिती सार्वजनिक होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. या भेटीत शिवसेना ठाकरे गट आणि वंचित आघाडी कशा प्रकारे एकत्र येऊ शकतात, याबाबत विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर बैठक
आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील फोर सिझनमध्ये ही बैठक पार पडली. दोन्ही नेत्यांची बैठकही महत्त्वाची मानली जात आहे. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर उपस्थित
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षासमोर पुन्हा राजकीय भरारी घेण्याचं खडतर आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांना आपल्या राजकीय पाठिंब्याचं रुपांतर निवडणुकीतून मिळणाऱ्या यशात करायचं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने सध्याची राजकीय गरज लक्षात घेता आघाडी करण्याबाबत एकमत झाल्याचे समजते. आज झालेल्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते.
कोणत्या मुद्द्यावर झाली चर्चा?
मुंबईसह सध्या राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील महानगरपालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या बैठकीत या महानगरपालिका निवडणुकांना एकत्रितपणे कशा प्रकारे सामोरे जाता येईल, याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडी ठाकरेंसोबत आल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय असेल, त्यांना कशाप्रकारे विश्वासात घेता येईल, यावरही दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली आहेत.