एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचे संजय राऊत यांच्याबद्दल वक्तव्य

बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातो आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला होता

0

मुंबई,दि.२९: एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांना कर्नाटक न्यायालयाने नोटीस बजावली आहे. २०१८ साली केलेल्या भाषणाबद्दल संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद सुरू झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावं कर्नाटकात विलीन होणार असल्याचे वक्तव्य केल्याने आणखी वाद चिघळला. संजय राऊत यांनी यावरून कर्नाटक सरकार व महाराष्ट्रातील सरकारवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असताना मला बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातो आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राऊतांच्या या दाव्यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे विनाकारण स्वत:ला मोठ असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात, असे ते म्हणाले. तसेच सीमवादावर लवकरच दिल्लीत जाऊन आपल्या वरिष्ठ वकिलांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काय म्हणाले शंभूराज देसाई?

“मला मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊतांवर एक खटला कर्नाटकमध्ये प्रलंबित होता. त्या खटल्यातल्या न्यायालयीन बाबी पूर्ण करण्यासाठी त्यांना जावं लागतं आहे. ते विनाकारण स्वत:ला मोठ असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात. आपण खूप मोठं आहोत, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो”, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. तसेच कर्नाटक सरकारकडून जे काही करण्यात येत आहे, त्याला महाराष्ट्र १०० टक्के उत्तर देईल. याप्रकरणी मी आणि चंद्रकांतदादा पाटील दोघंही दिल्लीतील आपले वरिष्ठ वकील आहेत, त्यांच्याशी भेटून चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

आज सकाळी सीमावादाच्या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना, मला बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातो आहे, दावा केला होता. “काल मला बेळगाव कोर्टाचे समन्स आले. हे काय चाललंय? क्रोनॉलॉजी समजून घ्या. अचानक कर्नाटकच्या बाजूने राजकारण का तापलं आहे? यामागे राजकारणही आहे आणि निवडणुकाही आहेत. माझं अमित शाह यांना आवाहन आहे की तुम्ही त्याकडे लक्ष द्या. नाहीतर आम्हाला भीती वाटतेय की इथे रक्तपात होऊ शकतो. ही आता केंद्राची जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टीत राजकारण नका करू”, असे ते म्हणाले होते. तसेच “बेळगाव कोर्टाचे मला समन्स हा नक्कीच कट आहे. मला तिथे बोलवून माझ्यावर हल्ला करून मला अटक करायची आहे. त्यांची पूर्ण तयारी आहे”, असा दावा त्यांनी केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here