महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहातील स्वच्छतागृहात लावला कॅमेरा

आरोपी विद्यार्थ्याने १२०० अर्धनग्न व्हिडीओ काढल्याने खळबळ

0

बंगळुरू,दि.२४: महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहातील स्वच्छतागृहात कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटकच्या बंगळुरूतील एका खासगी महाविद्यालयातील वसतीगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींच्या वसतीगृहातील स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा लावून एका विद्यार्थ्याने मुलींचे तब्बल १२०० अर्धनग्न व्हिडीओ बनवले आहेत.

याप्रकरणी आरोपी विद्यार्थी शुभम आझादला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेयसीचे अर्धनग्न फोटो काढल्याचाही शुभमवर आरोप आहे. स्वच्छतागृहात कॅमेरा लावताना काही मुलींनी रंगेहात पकडल्यानंतर आरोपीने वसतीगृहातून पळ काढला होता.

होसाकेरेहल्ली परिसरालगत असलेल्या एका खासगी महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. महाविद्यालय प्रशासनाने वसतीगृहातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीला याआधीही असे गैरकृत्य करताना रंगेहात पकडण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्याने दिलेल्या लेखी माफीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते.

महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीचा फोन आणि त्यातील १२०० आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या आरोपीच्या अन्य फोनमध्ये आणखी व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

“आरोपी अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असून त्याने गोपनीयतेचा भंग करत व्हिडीओ आणि फोटो काढले आहेत. तो मूळचा बिहारचा आहे. या गुन्ह्याशी संबंधित कलमांनुसार आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याआधारे आम्ही प्रकरणाची चौकशी करत आहोत’, अशी माहिती ज्येष्ठ पोलीस अधिकारी पी. कृष्णकांत यांनी ‘इंडिया टुडे’ला दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here