Big News: गुजरातमध्ये पुल कोसळल्याने मोठी दुर्घटना, अनेकजण पाण्यात पडल्याची भीती

0

गांधीनगर,दि.30: Big News गुजरातमधून मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटला आहे. पुल तुटला त्यावेळी 400 लोक तेथे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.

विशेष म्हणजे, पाच दिवसांपूर्वीच या झुलत्या पुलाची दुरुस्ती केली होती. पूल कोसळला, तेव्हा पुलावर शेकडो लोक होते. या दुर्घटनेनंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या लोकांनी बचावकार्य सुरू केले आहे. हा पूल पडल्यानंतर तिथे उपस्थित काही लोकांनी घटनेचा व्हिडिओ काढला. यात अनेकजण नदीत पडल्याचे दिसत आहे. 

पूल कोसळल्याने किती लोक नदीत पडले याची माहिती सध्या तरी कळू शकलेली नाही. मात्र, अपघाताच्या वेळी पुलावर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि प्रशासनासोबतच स्थानिक लोकही बचावकार्यात सहभागी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या अपघातानंतर केबल पुलाचे अनेक फोटो समोर आले असून, त्यात पूल मधूनच तुटून नदीत बुडाल्याचे दिसून येत आहे. पूल तुटल्यानंतर अनेकजण मधोमध अडकले असून, तुटलेला पूल धरून कसेतरी सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here