मुंबई,दि.27: बिग बॉस मराठी 4 प्रोमो कलर्स मराठीने अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रोमो पाहिल्यानंतर अमृता फडणवीसाच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बिग बॉस मराठी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. घरातील सदस्यांनी त्यांच्यासोबत खूप धमाल मस्ती केलेली पहायला मिळाली. स्पर्धकांनी काही प्रश्नही अमृता फडणवीस यांना विचारले. यावर त्यांनी मजेशीर उत्तरही दिली. त्यांची उत्तरं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरली. अशातच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये किरण माने अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारताना दिसत आहे.
कलर्स मराठीने अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, किरण माने अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारत आहे. किरण मानेंनी अमृता फडणवीसांना विचारलं, महाराष्ट्राचं एक राजकीय वर्तुळ आहे ते म्हणजे एक बिग बॉस आहे. तर त्यातले टॉप 5 सदस्य कोण वाटतात तुम्हाला. यावर अमृता फडणवीस म्हणतात, आपल्याला डॅशिंग लोक पाहिजे जे कधीही काही बोलू शकतात आणि आग लावू शकतात. पुढे किरण माने विचारतात आमच्यासारखे तुमच्यातही वाद होत असतील ना मी हे नाही करणार ते नाही करणार. यावर अमृता फडणवीस म्हणतात, ‘आपला नवरा हाती तर लागला पाहिजे ना काम द्यायला’.
नुकताच आलेला हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे आजचा या भागातही अमृता फडणवीसांसोबत थोडा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम पहायला मिळणार आहे. याशिवाय आजच्या भागात घरामध्ये भाऊबीज साजरी होणार आहे. यशश्री आणि समृद्धी योगेशला भाऊ मानतात तर ते आज भाऊबीज साजरी करणार आहेत.
दरम्यान, काल यशश्रीने अमृता फडणवीस यांना विचारले, तुमच्या कपलपैकी कोणाला वाटतं की तुम्ही बिग बॉसमध्ये असता तर जिंकला असता. यावर अमृता फडणवीस म्हणतात, ‘देवेंद्रजी जिंकू शकत नाही, त्यांना घरीच यायचंय ना शेवटी. देवेंद्रजी बिग बॉस आणि मी सगळे निर्णय घेणार’. त्यांचं हे स्टेटमेंट चांगलंच व्हायरल झालं.