मुंबई,दि.17: राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी मागणी केली होती. “कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं,” असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं होते.
अखेर भाजपनं पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात बोलताना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चा भाग असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. त्यावेळी मुंबई सत्र न्यायालय (Mumbai Sessions Court) परिसरात माध्यमांसोबत चर्चा करत असताना संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, ” अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चाच भाग आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 45 हजारांच्या मताधिक्यानं जिंकणार होता. त्यामुळंच भाजपनं उमेदवार मागे घेतला. पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे भाजपानं उमेदवारी अर्ज मागे घेतला.” तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, “भाजपनं या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणारच यासंदर्भात माहिती मिळाली होती.”
मुंबई सत्र न्यायालय परिसरात आजही खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत चर्चा केली. त्यावेळी बोलताना संजय राऊतांनी थेट भाजप आणि राज ठाकरेंवर आरोप केले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (MHADA) भूखंड आहे.