शरद पवार कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहू शकले नाहीत : देवेंद्र फडणवीस

0

मुंबई,दि.१३:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली होती. शरद पवारांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीका केली होती. मुख्यमंत्री पदावरून फडणवीस यांच्यावर शरद पवारांनी टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

‘पवारसाहेब ४ वेळा मुख्यमंत्री राहिले, पण फरक एवढाच आहे की मी सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलो. ते मोठे नेते आहेत, पण कधीच सलग पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी राहू शकले नाहीत. राहिले असते तर बरंच झालं असतं, त्यांनी चांगलंच काम केलं असतं. मात्र ते कधी दीड वर्ष, कधी दोन वर्ष असे चार वेळा मुख्यमंत्री राहिले,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर पलटवार केला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथं झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह अन्य काही व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. शरद पवार यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून भाजपने मावळ इथं शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची आठवण करून दिली. मात्र मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, असं पवार यांनी म्हटलं. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जालियनवाला बाग इथं झालेल्या प्रकरणातही पोलिसांनीच हत्या केली होती, मात्र त्यांना आदेश वरून देण्यात आले होते. तसंच मावळच्या घटनेतही पोलिसांना आदेश देण्यात आले होते,’ असा घणाघात फडणवीस यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here