मुंबई,दि.12: न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आईला भावनिक पत्र लिहिले आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ‘आई मी नक्की परत येईन’, असं भावनिक पत्र संजय राऊत यांनी त्यांच्या आईला लिहीलं आहे. संजय राऊत यांनी पत्र लिहित आईला म्हटलं आहे की,आई, मी नक्कीच परत येईन. जशी तू माझी आई आहेस तशीच शिवसेनादेखील आपली आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. त्या धमक्यांना मी घाबरलो नाही म्हणून मला तुरुंगात जावं लागलं, असंही संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी सत्र न्यायालयात असताना आईला हे भावनिक पत्र लिहिलं आहे. ‘आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आला आहे. हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली आहे.’
संजय राऊत यांनी 8 ऑगस्ट 2022 रोजी आईला हे पत्र लिहिलं आहे. संजय राऊत यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पत्र शेअर करण्यात आलं आहे. या पत्रात संजय राऊत यांनी शिवसेनेची तुलना आपल्या आईसोबत केली आहे. शत्रूच्या धमक्यांना घाबरलो नाही फक्त म्हणून आपल्याला तुरुंगात जावं लागलं असंही राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
राऊत यांनी पत्रात म्हटलंय की, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या शत्रूं पुढे झुकणार नाही. शिवसेनेचं आणि स्वाभिमानाचं बाळकडू तुझ्याकडूनच घेतलंय. शिवसेनेशी बेईमानी करायची नाही हे तुच शिकवलं आहे. बाळासाहेबांशी बेईमानी करायची नाही हे तुच मनावर कोरलं आहेस. कठीण काळात शिवसेनेला सोडलं, तर बाळासाहेबांना काय तोंड दाखवणार? देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे मीही अन्यायाविरोधात लढतोय, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.