शिवसेनेचा मोठा दावा, एकनाथ शिंदे धनुष्यबाण चिन्हावर दावाच करू शकत नाहीत

0

मुंबई,दि.७: शिवसेनेने मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यामुळे ते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा करूच शकत नाहीत असे शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे बाजू मांडताना दावा करण्यात आला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्य-बाणाची लढाई सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगात चिन्हासाठी दावा करण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चिन्हावर दावा ठोकत, आपल्याच गटाचा या चिन्हावर (धनुष्य-बाणावर) अधिकार असल्याचे म्हटले आहे. 

शिवसेना आणि शिंदे गटामध्ये ‘धनुष्यबाण’ चिन्हासाठी सुरु असलेली निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली असून आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी, आपली बाजू मांडताना शिवसेनेने (उद्धव ठाकरे गटाने) आयोगासमोर तर्क ठेवला, की एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी स्वतःच पक्ष सोडला आहे. यामुळे शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर त्यांचा कसलाही दावा असू शकत नाही. कारण ते पक्षातूनच बाहेर गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी गेल्या जून महिन्यात शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावले आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या एकूण 55 आमदारांपैकी तब्बल 40 आमदारांसह बंडाचा झेंडा उंचावला होता. एवढेच नाही, तर यानंतर त्यांना तब्बल एक डझन खासदारांचे समर्थनही मिळाले. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पक्षाच्या दावेदारीवरून संघर्ष सुरू आहे. मात्र, सध्या तांत्रिकदृष्ट्या उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख आहेत. 

निवडणूक आयोगाने पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना ८ ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. जर शिवसेनेच्या वतीने कोणतंही उत्तर आलं नाही, तर याप्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही निवडणूक आयोगाने पत्रात स्पष्ट केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here