निवडणूक आयोगाने सांगितले कसं ठरवणार खरी शिवसेना कोणाची

0

नवी दिल्ली,दि.28: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी घटनापीठासमोर सुरू आहे. शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्हावर कुणाचा अधिकार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाला घेता येणार आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचं चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. मात्र, खरी शिवसेना कोणाची आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार, याबाबत निवडणूक आयोग कशाच्या आधारे निर्णय घेणार, असा प्रश्न पडला आहे. त्यात आता निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राजीव कुमार म्हणाले, “शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता द्यावी अथवा चिन्हावरती निर्णय देताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. शिवसेनेच्या बाबतीत ‘बहुमताच्या आधारे’ चाचपणी करून निर्णय घेतला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचल्यानंतर यावरती कारवाई करू,” असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावत, शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून रोखलं जावं, अशी मागणी ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगालाच ‘खरी शिवसेना कोण’ हा निर्णय घ्यावा लागणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here