दि.12:सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यात प्राण्यांची काळजी घेणाऱ्यांचेही व्हिडिओ व्हायरल होतात. प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. त्यामुळे कितीतरी वेळा अगदी समोर माणसाचा जीव धोक्यात असताना पाहूनही माणसं धावून जात नाहीत. पण काही लोक असे असतात जे फक्त माणसंच नाही तर प्राण्यांसाठीही (Animal video) आपला जीव धोक्यात टाकतात. आपला जीव पणाला लावून एका मुक्या जीवाला वाचवणाऱ्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
तरुणाने एका कुत्र्यासाठी चक्क स्वतःला मृत्यूच्या दारात झोकून दिलं. कुत्र्याला वाचवण्यासाठी त्याने भरधाव ट्रेनसमोर उडी मारली. ट्रेन येत असताना रेल्वे ट्रॅकवर कुत्रा दिसताच हा तरुणही रेल्वे ट्रॅकवर गेला. कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला. कुत्र्याचा बचावाची ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.
व्हिडीओत पाहू शकता एक तरुण रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या उंचावरून पळत रेल्वे ट्रॅकवर येतो. तो ट्रॅकवर येताच त्याच्या मागून एक भरधाव ट्रेनही येताना दिसते. तरुण त्याच ट्रेनसमोरून ट्रॅकवर पळत सुटतो. पुढे गेल्यानंतर तिथं त्याच ट्रॅकवर एक कुत्रा उभा असलेला दिसतो. कुणीतरी या कुत्र्याला ट्रॅकवर बांधलेलं आहे. तरुण त्याला पाहतो आणि धावत त्याला वाचवण्यासाठी येतो. त्या कुत्र्याच्या गळ्यातील चैन रेल्वे ट्रॅकवरून सोडवतो.
ट्रेन त्यांना धडकणारच इतक्यात तो त्या तरुण कुत्र्याला घेऊन बाजूला होता. व्हिडीओ पाहतानाच आपल्या अंगावर अक्षरश: काटा येतो. अवघ्या काही सेकंदामुळे कुत्रा आणि तरुणाचा जीव वाचतो. कुणीतरी या कुत्र्याला या ट्रॅकवर मरणासाठी सोडलं पण हा तरुण कुत्र्यासाठी देवदूत बनून धावत आला आणि त्याला जीवदान दिलं.