भंडारा,दि.13: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशीला निलंबित करण्यात आले आहे. भंडारा शहरात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशीने मागच्या काही दिवसांपासून समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकण्याची जणू मोहीमच उघडली होती. पण, कुणीच आक्षेप घेत नसल्याने त्याचे धाडस वाढले व त्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली. ही टीका त्याला चांगलीच भोवली असून त्याला थेट निलंबित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून समाजात वैमनस्य निर्माण केल्याचा ठपका ठेऊन त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. सचिन सूर्यवंशी असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. निलंबना सोबतच आता या प्रकरणी त्याची चाैकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली.
सूर्यवंशी काही दिवसांपासून राजकारणी आणि व्यवस्थेविरुद्ध वादग्रस्त मजकूर फेसबुकवर टाकत होता. फेसबुकवर त्याच्याशी निगडित व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे त्याच्या पोस्टकडे कोणाचे लक्ष गेले नाही. नंतर त्याने नेते, त्यांचे कुटुंबीय तसेच धार्मिक आयोजनांबाबत वैमनस्य निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणे सुरू केले. या विरोधात सामाजिक कार्यकर्ता सुशील चौरसिया यांनी नागपूर शहरातील कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सूर्यवंशी विरुद्ध गुन्हा दाखल केला. ही बाब लक्षात घेता भंडाराचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सूर्यवंशींच्या निलंबनाचा आदेश काढला.
विशेष म्हणजे, सूर्यवंशी शिपाई म्हणून नागपूर पोलीस दलात सामील झाला होता. त्याने तहसील तसेच पाचपावली ठाण्यात काम केले आहे. बंगाली पंजामध्ये गुन्हेगारांच्या दोन गटांत झालेल्या गोळीबाराच्या तपासात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल त्याला तहसील ठाण्यातून नियंत्रण कक्षात हलविण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात त्याची भंडारा येथे बदली झाली. यापूर्वी त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. परंतु कोणी त्याला गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र आता गुन्हा नोंद झाल्यानंतर भंडारा पोलीस अधिक्षकांनी त्याला निलंबित केले आहे.