मुंबई,दि.८: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील काही दिवसांपासून ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Land Case) ईडीने त्यांना अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती.
पीएमएलए कायद्यानुसार, संजय राऊत यांना आज पुन्हा ईडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण न्यायालयाने संजय राऊत यांना काहीसा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे २२ ऑगस्टनंतर संजय राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत हे आणखी एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. ‘सामना’तील त्यांचे अग्रलेख आणि ‘रोखठोक’ हे सदर कायम चर्चेचा विषय ठरत होते. परंतु, संजय राऊत यांना ईडीने (ED) अटक केल्यानंतर हे लेख थांबतील, असा अंदाज होता. परंतु, संजय राऊत ‘ईडी’च्या कोठडीत असूनही ‘सामना’तून त्यांच्या नावाने लेख प्रसिद्ध होत आहेत. याच मुद्द्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.
एखादी व्यक्ती तुरुंगात असल्यास त्यांना अशाप्रकारे वृत्तपत्रांमध्ये लेख लिहता येत नाहीत. तसे करायचे झाल्यास न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. जोपर्यंत न्यायालय अशी परवानगी देत नाही, तोपर्यंत असे लेख लिहण्यास मज्जाव आहे. त्यामुळे आता ‘सामना’तील संजय राऊत यांचे लेखन थांबणार का, हे पाहावे लागेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी याविषयी आक्षेप नोंदवला होता. संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. मग ते तिथून ‘सामना’साठी लेख कसे लिहू शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. अशाप्रकारे तुरुंगातून लेख लिहायला संजय राऊत हे काही स्वातंत्र्यसेनानी नाहीत, असेही देशपांडे यांनी म्हटले होते. त्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आला होता. याची दखल घेत आता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून याविषयी संजय राऊत यांची चौकशी होऊ शकते. या चौकशीत संजय राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांना काय उत्तर देणार, हे पाहावे लागेल.