सिंधुदुर्ग,दि.9 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते.
या कार्यक्रमात राणे आणि ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. अखेर या कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी शिवेसेनेवर नाव न घेता निशाणा साधला. त्यानंतर भाषणासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एकाच मंचावर असताना नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं. आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचं कधी नाव घेत तर कधी नाव न घेत टोला लगावला. विशेष म्हणजे राणेंच्या कोकणातील होमपीचवर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुणी काय केलं आणि कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोकणाची संपत्ती आपल्याला जगासमोर न्यायची आहे. कोकणचं कॅलिफोर्निया करु असं अनेकजण म्हणायचे. बाळासाहेब म्हणाले होते, कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा भारी बनवा. कोकणच्या विकासानं आजपासून भरारी घेतली आहे. या विमानतळामुळं अनेकांना लाभ होणार आहे, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं असा टोला त्यांनी लगावला. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. पण कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली. नारायणराव आपण लघु उद्योग खात्याचे मंत्री आहात पण केंद्रीय मंत्री आहात. विकासकाम आपण नक्की कराल, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, हेही खरं आहे की, बाळासाहेबांना खोटं बोलणं अजिबात आवडायचं नाही. त्यांना खोटं बोललेलं एक क्षणही आवडायचं नाही. अशी खोटं बोलणारी जी लोकं होती त्यांना बाळासाहेबांनी शिवेसेनेतून काढून टाकलं होतं, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोल. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. मला त्या इतिहासात जायचं नाही.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. मी कुठेही पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला तेव्हा दुसऱ्याच क्षणी मी सही केली. विकासाच्या कामात मी कोतेपणा आणू इच्छित नाही. पण पेड्यातला गोडेपणा अंगी बाळगावा लागतात. म्हणून तिळगूळ घ्या गोड बोला असं म्हणतात. मला बोलायचं नाही. मला बोलावं लागलं. आजचा कार्यक्रम कोकणसाठी महत्त्वाचा आहे. सगळे मिळून काम करु