मुंबई,दि.30: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तसेच महाराष्ट्राविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्यामळे राज्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
“या राज्यपालांबद्दल काय बोलावं. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली. महाराष्ट्र किंवा मुंबईबद्दल त्यांनी भाष्य केले. मुंबई किंवा महाराष्ट्र सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुंबईची प्रगती सर्वसामान्यांच्या कष्टातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. मी याच्या फार खोलात जात नाही. कारण राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही,” असे शरद पवार म्हणाले.
मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. तसेच कोश्यारी यांनी माफी मागावी, त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे अशी मागणी केली जात आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. राज्यपालांच्या विधानामुळे महाराष्ट्राचा अपमान झालेला नाही. त्यांनी केलेले वक्तव्य योग्य असून मी त्याचे समर्थन करतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. टीव्ही 9 मराठीने तसे वृत्त दिले आहे.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी पक्षपाती राजकारण सुरू आहे. केवळ राज्याला बदनाम करण्यासाठी अशी विधाने केली जातात. बाहेरचे राज्यातील लोक इथे येतात तेव्हा तेथील राज्यकर्ते तिथल्या लोकांना रोजगार देण्यास कमी पडले हे दिसून येते. राज्यपालांचे विधान महाराष्ट्राला तोडण्यासारखं आहे. ज्यांचा इतिहास आमच्या धमण्यातून वाहतोय त्यांच्याबद्दल जाणीवपूर्वक वाक्य करायची. अखंड महाराष्टाला तुकडे तुकडे करण्याचं राजकारण सुरू आहे. राज्यपालांनी कुठलेही विधान करताना जबाबदारीने केले पाहिजे. परंतु तसे होत नाही असं त्यांनी सांगितले.