मुंबई,दि.29: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या भाषणादरम्यान अजान सुरू होताच आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा होत आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरू केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना भाजपाने पाठिंबा दिल्याने ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेचे 40 आमदार त्यांच्याबरोबर गेले आहेत. शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही शिंदे गटात सामिल होत आहेत. शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी व संघटना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे दौऱ्यावर आहेत.
आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांची संवाद साधत निष्ठा यात्रा सुरू केली आहे. अनेक ठिकाणी ते कार्यकर्त्यांची संवाद साधत आहेत. मुंबईतल्या चांदिवली भागात आदित्य ठाकरे यांनी निष्ठायात्रा काढत शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्याला प्रचंड गर्दी झाली होती. या मेळाव्यात भाषण करताना मशिदीवरील भोंग्यावर अजान सुरू झाली. आदित्य भाषण करताना हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अजान संपेपर्यंत सभास्थळी शांतता होती. अजान संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पुन्हा भाषणाला सुरूवात केली. आदित्य ठाकरेंच्या या कृतीची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर नियमानुसार चालू ठेवावेत अथवा मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे काढावेत अशी मागणी करत आंदोलन केले होते. यावेळी मनसेकडून अनेक शहरात हनुमान चालीसा पठण करण्यात येत होती. अजानला विरोध नाही परंतु भोंग्याला विरोध आहे असं सांगत राज यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने मशिदीवरील भोंगे हटवावेत अशी मागणी केली.
त्याचसोबत आमचं सरकार आल्यास मशिदीवरील भोंगे हटवले जातील असं जाहीर केले होते. राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या या भाषणाचा व्हिडिओही शेअर केला होता. इतकेच नाही औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे भोंग्याच्या प्रश्नी बोलत असताना अचानक अजान सुरू झाली. तेव्हा राज यांनी पोलिसांना विनंती करत ताबडतोब हे थांबवा अन्यथा पुढे काय होईल सांगू शकत नाही असा इशारा दिला होता.
माझे वडील आजारी असताना दुसऱ्याबाजूला हे गद्दार आमदार फोडण्याची तयारी करत होते. माझ्यासोबत कोण येतंय कसं येतंय हे पाहत होते हे तुम्हाला पटणार आहे का?, आमदारांची जमावजमव करण्यास सुरूवात केली. याच गद्दारांना उद्धव ठाकरेंनी ओळख दिली. पाठित खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंचा वाईट काळ सुरू असताना 40 जणांनी सोबत राहायला हवं होतं की गद्दारी करायला हवी होती? असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना विचारला.