दि.23: काँग्रेसने (Congress) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणींची लेक झोईश इराणी ही मृत माणसाच्या नावावर लाय़सन घेऊन गोव्यात बार रेस्टॉरंट चालवित असल्याचा आरोप केला आहे. तसेच यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे इराणी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
झोईश इराणीवर बनावट लायसन काढून बार चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे लायसन जून 2022 मध्ये काढण्यात आले आहे. ज्याच्या नावे हे लायसन काढले त्याचा मे 2021 मध्येच मृत्यू झाला आहे. 13 महिन्यांपूर्वी ज्याचा मृत्यू झाला त्याच्यानावे जूनमध्ये लायसन काढण्यात आले आहे. गोव्यातील कायद्यानुसार एका रेस्टॉरंटला एकदाच लायसन मिळू शकते. परंतू सिली सोल्स बारला दोन लायसन्स दिले आहेत, असा आरोप खेरा यांनी केला आहे.
याचबरोबर आणखी एक बेकायदेशीर बाब म्हणजे या रेस्टॉरंटला रेस्टॉरंट चालविण्याचे लायसन मिळालेले नाही, असे सांगत खेडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचेही सांगितले आहे. त्यांनी ही नोटीसही मीडियाला दाखविली आहे.
यावर झोईश इराणी यांच्या वकिलांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहेत. झोईश यांचे अशा कोणत्याही रेस्टॉरंटशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच स्मृती इराणी यांनी या आरोपांवर काँग्रेसवर टीका केली आहे.
काँग्रेसने आपल्या मुलीवर बार चालवल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी फेटाळून लावला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, माझी मुलगी बार चालवत नाही. काँग्रेसने आपल्या मुलीचे चारित्र्य हनन केले आहे, असे ते म्हणाले.