उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना नवी नोटीस

0

मुंबई,दि.10: शिवसेनेचा प्रतोद कोण यावरून वाद आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये आपला विजय होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटांनी केला आहे. त्याचवेळी या दोन्ही गटाच्या आमदारांना एक नवी नोटीस मिळाली आहे.

विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी या आमदारांना नोटीस बजावली असून त्याला 7 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना ठाकरे गट प्रतोद सुनिल प्रभू आणि शिवसेना शिंदे गट प्रतोद भरत गोगावले यांनी एकमेकांच्या गटातील आमदारांना व्हिप बजावला होता. त्याचबरोबर आपलाच पक्ष खरा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर विधिमंडळ सचिवांनी ही नोटीस बजावली आहे. आता दोन्ही गटांना 7 दिवसांमध्ये आपली बाजू मांडावी लागणार आहे.

‘अडीच वर्षापूर्वी जे सरकार स्थापन झालं होतं ते आता झालं. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही काहीही चुकीचं केलं नाही. आम्हीच शिवसेना आहोत हे लवकरच सिद्ध होईल.’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. दिल्ली दौऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

तर, ‘माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल. हा निकाल देशाच्या लोकशाहीची वाटचालीची दिशा दाखवणारा निकाल ठरेल,’ असा दावा उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here