मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट झाली नाही

0

मुंबई,दि.६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राष्ट्रवादीचे शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची बातमी अफवा असल्याचं शिंदे यांच्या कार्यालयामार्फत सांगण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. मात्र आता शिंदे यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ही भेट झालीच नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर ही अफवा पसरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. काही वृत्तवाहिन्यांनी शिंदे आणि पवार यांच्या जुन्या फोट्याच्या आधारावर रात्री उशीरा हा दोन्ही नेत्यांची सिव्हर ओकवर भेट झाल्याच्या बातम्या दिल्या होत्या. मात्र अशाप्रकारची कुठलीही भेट झालेली नाही असं मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर हॅण्डलवरुनही यासंदर्भात एक ट्विट करण्यात आलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये,” असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे.

शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपा व एकनाथ शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल आणि विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकीत केले होते. याकडे लक्ष वेधण्यात आले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी, आमची हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून नैसर्गिक युती आहे. या सरकारला अडीच वर्षे कोणताही धोका नाही, असे म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here