शिंदे गटात गेलेल्यांच्या आज लक्षात येणार नाही पण जेव्हा येईल तेव्हा उशीर झालेला असेल

0

मुंबई,दि.५: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडत राज्यात सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाकितानुसार शिवसेनेनेही हे शिंदे सरकार सहा महिनेच सत्तेत असेल असं म्हटलंय. सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवसेनेनं अधिवेशनामध्ये झालेल्या भाषणांच्या संदर्भातून सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. त्याचप्रमाणे शिवसेनेनं विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणावरुनही शाब्दिक चिमटे काढत राज्यातील सर्वोच्च भाजपाला नेत्याला सुनावलं आहे.

अनेक ‘विश्वासराव’ पळून गेले

“भाजपापुरस्कृत शिंदे गटाच्या सरकारने विधानसभेत बहुमताची चाचणी जिंकली आहे. यात आनंद किंवा दुःख वाटावे असे काही नाही. ज्या परिस्थितीत शिंदे सरकार बनवले आहे त्यामागची प्रेरणास्थळे पाहता महाराष्ट्रात दुसरे काही घडेल याची खात्री नव्हती. संतोष बांगर हे हिंगोलीचे आमदार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले व चोवीस तासांत असे काय घडले की, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हे ‘निष्ठावान’ शिंदे गटाच्या कॅम्पात शिरले. शिवसेनेत राहिल्याबद्दल या निष्ठावान आमदाराचे हिंगोलीत लोकांनी भव्य स्वागत केले. त्यांच्या निष्ठेवर लोकांनी फुले उधळली. आमदार म्हणून विजयी झाले तेव्हाही लोकांनी असे स्वागत केले नव्हते, असे सांगून कपाळास उटी-चंदन लावलेले बांगर रडू लागले. तेच बांगर सोमवारी शिंदे गटात पळून गेले. त्यामुळे विश्वास फक्त पानिपतातच पडला असे नाही, तर प्रत्यक्ष महाराष्ट्रातही अनेक ‘विश्वासराव’ पळून गेले,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

राजकीय प्रतिष्ठेचे लक्षण समजायचे काय?

“महाराष्ट्रात सत्तांतर घडले त्यात तत्त्व, नैतिकता आणि विचारांचा कोठे लवलेशही दिसत नाही. आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असे भासवून चाळीसेक लोक विधिमंडळातून बाहेर पडतात. पक्षाचा आदेश झुगारून मतदान करतात. न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत. अशा बेकायदेशीर लोकांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे व त्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे पद स्वीकारून आपल्यापेक्षा कनिष्ठ नेत्याची भलामण करणे हेच फडणवीस यांच्या राजकीय प्रतिष्ठेचे लक्षण समजायचे काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.

शिवसेनेचा विरोध

“शिवसेनेचा विरोध व महाराष्ट्रद्रोह या सूत्रानुसार शिंदे यांचा जीर्णोद्धार झाला. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भविष्य अंधकारमय आहे. शिंदे हे म्हणे शिवसेना-भाजपा ‘युती’चे मुख्यमंत्री असल्याचे जाणीवपूर्वक बोलून लोकांत भ्रम पसरवला जातो. हीच तर भाजपाची कपटी खेळी आहे. २०१४ साली याच लोकांनी ‘युती’ तोडली. २०१९ साली याच लोकांनी ‘युती’चा म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मग आता फडणवीस कोणत्या युतीची शेखी मिरवत आहेत. भास्कर जाधव विधानसभेत मुद्द्याचे बोलले. मविआ सरकारच्या पहिल्या दिवसापासून सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. नियती कुणाला सोडत नाही. ज्यांच्या मागे ईडी लावली त्यांच्याच घराखाली केंद्र सरकारचे पहारे देऊन संरक्षण द्यावे लागले. जाधव म्हणतात, त्यावर बोला. याच ‘ईडी-पीडी’ आमदारांच्या मतांवर शिंदे गटाचे राज्य भाजपाने आणले ते काय बहुमत आहे?,” असा प्रश्न सेनेकडून विचारण्यात आलाय.

अदृश्य शक्ती कोण?

“बहुमत चाचणीत भाजपापुरस्कृत शिंदे गटास १६४ आमदारांनी पाठिंबा दिला व विरोधात ९९ मते पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार बहुमत चाचणीच्या वेळेस गैरहजर राहिले. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री विधानसभेत पोहोचू शकले नाहीत याचे आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानले आहेत. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे,” असा चिमटाही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून काढलाय.

सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड…
“शिवसेना संपत होती म्हणून आम्ही बंड केल्याचे भंपक विधान काही फुटीर आमदार करीत आहेत. तुम्ही संपाल, पण शिवसेना कधीच संपणार नाही. शिंद्यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत. बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक व तात्त्विक नसते. त्यास नीतिमत्तेचा कितीही मुलामा दिला तरी त्या बंडाला तेज प्राप्त होत नाही! भाजपाने घडवून आणलेल्या बंडाची तीच स्थिती आहे. बहुमत जिंकले. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here