आज शिंदेंची गाडी सुसाट सुटली होती, ती बुलेट ट्रेनच होती, ते काही थांबायला तयार नव्हते: अजित पवार

0

मुंबई,दि.४: विधानसभेत विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार भाषण केले. आज विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले. एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला याबद्दलही भाष्य केलं. शांत राजकारणी म्हणून ओळखले जाणाऱ्या एकनाथ शिंदेचं अगदी वेगळं रुप या भाषणादरम्यान पहायला मिळालं.

एकनाथ शिंदेंच्या भाषणावर विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेले अजित पवारही चांगलेच प्रभावित झाल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदेंनी प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे अनेक नेत्यांची नावं घेऊन कठोर शब्दांमध्ये टीका केली. मात्र त्याचवेळेस त्यांनी लगावलेल्या काही टोल्यांमुळे सभागृहामध्ये केवळ भाजपा आणि बंडखोर आमदारच नाही तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदारांनाही हसू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

असं भाषण करताना कधी पाहिले नव्हते

विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर आभाराचे भाषण देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं कौतुक केलं. “मी शिंदेंना २००४ पासून आमदार म्हणून बघतोय. २००४ पासून २०२२ पर्यंत तुम्हाला असं भाषण करताना मी कधीच पाहिलं नव्हतं,” असं अजित पवारांनी म्हणताच मुख्यमंत्री शिंदेंनी हात जोडून हसून या प्रतिक्रियेला प्रतिसाद दिला. “तुम्ही खूप खुलून भाषण करत होता. माझी खूप बारीक नजर असते. त्याच वेळेस तुमच्या उजव्या हाताला बसलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहत होतो. ते सारखे म्हणाचे आता बस्स झालं. आता बस्स झालं. इतक्यांदा ते सांगायचे की मी जयंतरावांना सांगतो की बघा ते कसं बस्स करा सांगतायत,” असं या भाषणाचं वर्णन करताना अजित पवार म्हणाले.

आज शिंदेंची गाडी सुसाट सुटली होती

“पण आज शिंदेंची गाडी सुसाट सुटली होती. ती बुलेट ट्रेनच होती. ते काही थांबायला तयार नव्हते. फडणवीसांना वाटत होतं की बोलता बोलता असा काही एखादा वेडावाकडा शब्द जाईल याची चिंता होती. वक्ता बोलत जातो बोलत जातो आणि तो कधी घसरतो काही कळत नाही. तसं काही आपल्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये असं काही होऊ नये याची एवढी काळजी उपमुख्यमंत्र्यांना होती की विचारता सोय नाही,” अशी टीप्पणी अजित पवारांनी केली. केसरकर आणि गुलाबरावही बस्स आता असं सांगत होते,” असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना “मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली. आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो तसं मनाला लागणाऱ्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या. आपण ज्यांच्यासाठी झटतो, काम करतो त्यांच्याकडूनच आपल्या लोकांकडून मन दुखावलं गेलं की जीवाला लागतं,” असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचं तोंड भरुन कौतुक केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here