उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना मान्यता

0

मुंबई,दि.4: शिवसेनेत अंतर्गत कलहामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे भाजपाने पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 39 आमदारांचा पाठिंबा आहे, तर ठाकरे गटाकडे केवळ 16 आमदार उरले आहेत. असं असताना आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. विधीमंडळ सचिवालयाने एक परिपत्रक जारी करत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता दिली आहे.

अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द

शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असं पत्र विधानमंडळ सचिवानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठविले आहे.

त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील इतर आमदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संबंधित आमदारांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेला पक्षाचा व्हीप पाळला नाही. त्यामुळे या आमदारांना एकनाथ शिंदे यांनी नोटीस जारी केली, तर कायद्यानुसार आदित्य ठाकरेंसह उर्वरित 15 आमदार निलंबित होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. विधीमंडळानं एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता देणं हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पत्रात काय म्हटलंय?

22 जून रोजी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र होते. यासंदर्भातील ठराव होता. या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला कळवण्यात येते की, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना दूर करुन अजय चौधरी यांची निवड करण्यात आली होती. याबाबत कायदेशीर तरतूदीपाहून अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी अजय चौधरी यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून रद्द करुन एकनाथ शिंदे यांची दिनांक 31 ऑक्टोबर 2019 रोजी गटनेते म्हणून करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्यात येत आहे. सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

खरंतर, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर तातडीची कारवाई म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. त्यांच्याजागी विधीमंडळ गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण विधीमंडळ सचिवालयाने अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here