अहमदनगर,दि.६ : अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये रविवारी लॉकडाउनचा आदेश दिल्यानंतर आता आणखी ८ गावांत नव्याने हा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन केलेल्या गांवाची संख्या ६९ झाली आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणाहून याला विरोध होऊ लागला आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी सरकार आणि प्रशासनावर आरोप करून दोन दिवसांत योग्य निकष लावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर पारनेर तालुक्यात व्यापाऱ्यांनी आंदोलन केले.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे आकडे कमी होत असताना नगर जिल्ह्यात मात्र दिलासा मिळण्यास तयार नाही. त्यामुळे प्रशासनाने कठोर उपाय हाती घेतले आहेत. पहिल्या टप्प्यात ६१ गावांत लॉकडाउन करण्यात आला. त्यानंतर नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेरमधील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर, शेवगावमधील वडुले बु. या गावांतमध्ये लॉकडाउनचा आदेश देण्यात आला आहे.