पिंपरी-चिंचवड,दि.३१: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटामधील “बैल कधी एकटा येत नाही, सोबत नांगर घेऊन येतो”, हा डायलॉग म्हणून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच, तो नांगर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी आहे असे म्हणताच बैलगाडा मालक आणि शर्यती पाहण्यासाठी आलेल्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे बैलगाडा शर्यत पार पडत आहे. त्याला आज (मंगळवार) देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत भारतातील सर्वात मोठी असल्याचं बोललं जातं आहे. यावेळी हेलिकॉप्टर मधून बैलगाडा शर्यतीच्या घाटावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मोठ्या उत्साह दिसत आहे. नांगर हा जो बैलगाडा शर्यतीला विरोध करतो त्याच्या करीता आहे. बैलगाडा अखिल भारतीय संघटना, आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली. बैल हा पळणारा प्राणी आहे तसा अहवाल सर्वोच्च न्यायालयात आम्ही सादर केला. म्हणून बैलगाडा शर्यत सुरू झाली. बैलगाडा शर्यत बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. म्हणून इथून पुढं बैलगाडा शर्यत कधीच बंद होऊ देणार नाही. असंही यावेळी फडणवीस म्हणाले.