मुंबई,दि.26: ED Raids On Anil Parab: राज्याचे परिवहन मंत्री शिवसेना नेते अनिल परब यांच्या (Anil Parab) वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे.
ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली जात आहे.
ईडीने अनिल परब यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे.
सचिन वाझे कनेक्शन?
पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परबा यांचे नाव समोर आले होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरू झाला. त्याच अनुषंगाने ईडीने आज छापा मारला.
रिसोर्ट प्रकरण
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.