अक्कलकोट,दि.20 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अक्कलकोट आगाराची 41 प्रवाशांना घेवून बबलादहून येणारी बस शुक्रवार, 20 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान कल्लप्पावाडी जवळील शिवारात स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने 12 प्रवाशी जखमी झाले असून कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
याबाबत स्थानिक नागरिकांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, अक्कलकोट आगाराची बस क्रमांक एम.एच.12/ईएफ/6498 ही अक्कलकोट-बबलाद बस सकाळी 7 वाजणेच्या दरम्यान बबलाद, बोरोटी, बोरोट स्टेशन ते कल्लप्पावाडी पर्यंतच्या गावातील 41 प्रवाशांना घेवून अक्कलकोटकडे येत असताना सकाळी 10 वाजणेच्या सुमारास कल्लप्पावाडी पासून दोन कि. मी. अंतरावर बसचे स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे सदरील वाहनावरील वाहन चालकाचा ताबा सुटल्याने धिम्यागतीने जाणारी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने एसटीतील बहुतांश प्रवाशी जखमी झालेले आहेत.

त्यातील 12 प्रवाशी गंभीर जखमी झाले असून यामध्ये मीरा राठोड (वय 31), नबीलाल जमादार (वय 68), सुनिता पवार (वय 43), महंमद जमादार (वय 21), संदीप पवार (वय 32, रा.सर्व बोरोटी), गौराबाई पाटील (वय 30, रा.होटगी), अंबाबाई संगोळगी (वय 39, रा.बबलाद), वैजंता बनसोडे (वय 35), ओंकार बनसोडे (वय 13), कस्तुरा बनसोडे (वय 60, रा.सर्व तळेगाव), शोभा कांबळे (वय 28), कमळाबाई जानकर (वय 65, रा. सर्व रा.कल्लप्पवाडी) यांचा समावेश आहेत.
सदरील अपघात घडल्याची बातमी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांना कळताच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची रुग्णवाहिका तात्काळ पोहोचली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय व 108 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल होवून जखमींचा उपचाराकरिता अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय व काही जण खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अडकलेल्या रुग्णांना एसटीतून बाहेर काढुन उपचाराकरिता पाठविताना सरपंच जयकुमार जानकर, समाजसेवक उमेश पांढरे, महेश लोकरे, संजय पांढरे, लक्ष्मण सोनकर, ईरप्पा ढोणे, यल्लप्पा निंबाळकर, योगेश जानकर यांच्यासह कलप्पावाडी ग्रामस्थांनी मदत केले.