नांदेड,दि.१५ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. शरद पवार नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने तीनही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बसून निर्णय घेतील. परंतु, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे तर पूर्ण करीलच; परंतु, पुढील पाच वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवार हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पहिल्यांदाच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यात केंद्राचा इंधनावरील कर सर्वाधिक असून तो कमी करण्याची गरज आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या किमती, महागाई वेळीच रोखली नाही तर त्याचे परिणाम वेगळे असतील, असेही पवार म्हणाले. भाजपचे चंद्रकांत पाटील, नारायण राणे हे सरकार पाडण्याच्या तारखांवर तारखा देतात. ते आम्ही एन्जॉय करतो, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने आगामी निवडणुका एकत्र लढायच्या की वेगवेगळ्या, या अनुषंगाने पंधरा दिवसांत निर्णय होईल. वेगवेगळे लढून नंतर एकत्र येणे अथवा एकत्रित मिळून लढणे. त्यावर प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असे ते म्हणाले.