मुंबई,दि.24: शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अप्रत्यक्षरित्या डिवचलं आहे. राऊतांनी मकाऊतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राऊतांनी 6 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परदेशात कसिनो खेळत असल्याचा आरोप याआधीच संजय राऊतांनी केला होता. त्याबाबतचा कथित फोटो राऊतांनी शेअर केला होता. त्यावरुन उठलेली आरोपांची राळ खाली बसण्यापूर्वीच राऊतांनी आता व्हिडीओची झलक शेअर केली आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
संजय राऊत यांनी आज मकाऊतील नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका कसिनोसदृश्य ठिकाण दिसत आहे. एक व्यक्ती कॅमेरा घेऊन चालत आहे.आजूबाजूला अनेक लोक टेबल खुर्चीवर बसले आहेत. त्यामुळे या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळेच संजय राऊतांनी या सहा सेकंदाच्या व्हिडीओला पिक्चर अभी बाकी है, असं कॅप्शन दिलं आहे.
संजय राऊतांनी चार दिवसापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधील फोटो शेअर केला होता. यामध्ये बावनकुळे हे कसिनो खेळत असल्याचा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यावेळी राऊतांनी “19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” असं म्हटलं होतं. यावरुन त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंकडे अप्रत्यक्ष बोट केलं होतं.