नंदुरबार,दि.30: Shahada Accident: बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात (Accident) 5 ठार तर 17 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नंदुरबारमधील (Nandurbar) शहादा (Shahada) शहरातील एक भीषण अपघात (Shahada Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. यात शहादा बायपास रस्त्यावर (Shahada Bypass Road) खासगी बस आणि आयशर टेम्पो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडल्याचं समोर येत आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यातील काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर येत आहे. शहादा तालुक्यातून रोजगारसाठी मजुरांचे स्थलांतर सुरू आहे. याच स्थलांतरादरम्यान झालेल्या अपघतात पाच जणांनी जीव गमावला आहे.
मजुरांना गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथे घेऊन जाणारी खासगी बस आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. शहादा शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर नवीन बस स्थानकालगत हा अपघात झाला. ही धडक इतकी भयानक होती की अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये पाच जणांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे, तर पाच वर्षीय चिमुकली शहादा येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आणि घटनेची माहिती घेतली.