पोलिसांनी केली  5 कोटींची कॅश जप्त

0

सोलापूर,दि.22: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचं भरारी पथक विविध चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करत असते. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटींची कॅश जप्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही कॅश इनोव्हा क्रिस्टा कारमध्ये होती.

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका खासगी वाहनात कोट्यवधीची रोकड सापडल्याचं उघड झालं आहे. ही रक्कम सांगोला इथं नेण्यात येत होती. सध्या पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी हे या प्रकाराचा तपास करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या रोकडमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 

या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय राऊतांनी ट्विट करून  शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीतून खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले. हे आमदार कोण? काय गाडी.. काय डोंगर.. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटींचा हा पहिला हप्ता! काय बापू किती हे खोके?  

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनात कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम जवळपास 5 कोटींपर्यंत असण्याचा अंदाज आहे. पुणे सातारा महामार्गावरील रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी दुपारपासून पोलिसांनी खेड शिवापूर टोल नाक्याजवळ नाकाबंदी केली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास एक संशयित वाहन पोलिसांना आढळले. पोलिसांनी हे वाहन रोखून त्यात तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. सध्या खेड शिवापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here