एक दिवसात १.२८ कोटींचा अनधिकृत वीजवापर उघड
पुणे,दि.१४: वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणकडून वीजचोरीविरुद्ध धडाक्यात मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तिसऱ्या एक दिवसीय मोहिमेत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १४१८ ठिकाणी १ कोटी २८ लाख रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा महावितरणकडून नुकताच पर्दाफाश करण्यात आला आहे. तिनदा घेतलेल्या या एक दिवसीय विशेष मोहिमेत आतापर्यंत ४९८३ ठिकाणी ५ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वापर उघडकीस आला आहे. वीजचोरी व दंडाची रक्कम न भरणाऱ्या चोरट्यांविरुद्ध विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
आर्थिक संकटात असलेल्या महावितरणने वीजहानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाईसह गेल्या ऑगस्टपासून पुणे प्रादेशिक विभागात एक दिवसीय विशेष मोहीम सुरु केली आहे. प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी याबाबत निर्देश दिले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागासह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शेकडो पथकांद्वारे वीजचोरीविरुद्ध धडाक्यात कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये तिसऱ्या एक दिवसीय मोहिमेत शनिवारी, दि. ९ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता सुरु झालेल्या कारवाईचे सत्र दिवसभर सुरु होते. यात पाचही जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी १६ हजार ५२७ वीजजोडण्यांच्या तपासणीमध्ये १४१८ ठिकाणी ८ लाख ३२ हजार युनिट म्हणजे १ कोटी २८ लाख ८ हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आला आहे.
या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात ८८९ ठिकाणी ८१ लाख १९ हजार, सातारा- २०३ ठिकाणी १७ लाख ६३ हजार, सोलापूर- ६८ ठिकाणी ५ लाख १९ हजार, कोल्हापूर- ७९ ठिकाणी १३ लाख ४५ हजार आणि सांगली जिल्ह्यात १७९ ठिकाणी १० लाख ६२ हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघड झाला आहे. आतापर्यंत तिनही एक दिवसीय मोहिमेत पुणे जिल्ह्यात २५३५ ठिकाणी ३ कोटी ४१ लाख ३५ हजार, सातारा- ६२८ ठिकाणी ४५ लाख १६ हजार, सोलापूर- ९२९ ठिकाणी ९० लाख ३ हजार, कोल्हापूर- ३९१ ठिकाणी ६७ लाख ९६ हजार आणि सांगली जिल्ह्यात ५०० ठिकाणी १९ लाख ९७ हजार असा एकूण ४९८३ ठिकाणी ५ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपयांच्या विजेचा अनिधिकृत वापर उघडकीस आला आहे.
महावितरणकडून मागेल त्यांना तत्काळ वीजजोडणी देण्यात येत आहे. त्यासाठी मोबाईल ॲप किंवा अधिकृत संकेतस्थळावरून नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. वीज वापरासाठी आकडे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे वीजचोरी करू नये तर अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यासोबतच वीजबिलांच्या थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा वीजपुवरठा खंडित करण्यात आला आहे त्यांच्याही वीजजोडण्यांची तपासणी विविध पथकांद्वारे करण्यात येत आहे. परस्पर वीजपुरवठा सुरु करून घेणे किंवा शेजाऱ्यांकडून वीज घेण्याचा प्रकार आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे.
विशेष मोहिमेतून ४.५६ लाख युनिटचा महसुल – दि. ९ ऑक्टोबरच्या विशेष मोहिमेत मीटर रिडींगमधील अनियमितता दूर करून महावितरणला पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी ४ लाख ५६ हजार युनिटचा म्हणजे सुमारे ५० लाख १६ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. यात शून्य ते ३० युनिटपर्यंतच्या तपासणीमध्ये मीटर बंद, गती संथ, डिस्प्ले नसणे आदी विविध कारणांमुळे १४५९ वीजजोडण्यांमध्ये प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा रिडींग कमी नोंदविले जात असल्याचे दिसून आले. या सर्व वीजजोडण्यांमधील रिडींग नियमित करण्यात येत असून आवश्यकतेनुसार मीटर देखील बदलण्यात येत आहेत.