अक्कलकोट,दि.९: Accident:अक्कलकोट गाणगापूर रोडवर कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात ३ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. येथील अक्कलकोट ते गाणगापुर जाणारे रोडवर बुधवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास मौजे बिजगेर तालुका अक्कलकोट शक्करपीर दर्गाजवळ कार व ट्रकच्या धडकेत कारमधील तीन युवकांचा मृत्यू झाला. लग्नाची पत्रिका देवाचरणी अर्पण करण्यासाठी जात असताना होणाऱ्या नवरदेवांसह त्यांच्या दोन्ही मित्रावर काळाने घाला घातला.
दिपक सुभाष बुचडे (वय २९ वर्षे) रा. मांरुजी ता. मुळशी जि. पुणे, आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय २८ वर्षे) रा. हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे, आशुतोष संतोष माने (वय २३) वर्षे रा. वाघोली ता. हवेली जि पुणे असे मयत तीघांची नांवे आहेत. याची दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट येथे नोंद झाली असुन ट्रक ट्रेलरच्या अज्ञात चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास दिपक सुभाष बुचडे हा त्याची लग्न पत्रिका देवाचरणी अर्पण करण्यासाठी त्याचे मित्र आकाश साखरे (रा. हिंजवडी) व आशुतोष माने (रा. वाघोली) यांना सोबत घेवुन हुन्दाई कार क्रमांक एच. एच.१४ जे एक्स ७८७८ या वाहनाने पुणे येथुन तुळजापुर मार्गे अवकलकोट ते गाणगापुर जात असताना मौजे बिजगेंर गावाचे शिवारातील शक्करपीर दर्गाजवळील अक्कलकोट ते गाणगापुर जाणारे रोडवर समोरुन अक्कलकोटचे दिशेने येणारे ट्रक ट्रेलर नंबर आर जे १४ जीके १७२९ वरील चालकाने त्याचे ताब्यातील वाहन वेगाने, हयगयीने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवुन कारला समोरुन जोराची धडक देऊन त्यातुन प्रवास करणारे तीन्ही युवाकांना गंभीर जखमी करून त्यांना उपचारार्थ दाखल न करता किंवा अपघाताची खबर न देता त्यांचे मरणास तसेच दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे.

ट्रेलर चालक ताब्यातील वाहन जागीच सोडुन पळुन गेला आहे. ट्रक ट्रेलर नंबर आर जे १४ जीके १७२९ चे अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद मयताचा चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे (वय ४१ वर्षे) व्यवसाय शेती रा. मारुंजी ता. मुळशी जि. पुणे यांनी दिली.
घटना स्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, दक्षिण पोलीस स्टेशन पोनि प्रदिप काळे यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदिप काळे हे करीत आहेत.
१८ जुनला होणार होते लग्न
मयत दिपक सुभाष बुचडे याचे १८ जुनला लग्न होणार होते. त्याची लग्न पत्रिका तुळजापूर, अक्कलकोट येथे देवाचरणी अर्पण करून मित्रांसह गाणगापूर कडे जात आसताना हा अपघात झाला. दुसरा आकाश ज्ञानेश्वर साखरे याचे दोनच महिन्यापुर्वी लग्न झाले होते. तर तिसरा मयत अविवाहित असल्याची माहिती मिळत आहे.