मुंबई,दि.24: क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान न्यायालयीन कोठडीत आहे. आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. अंमली पदार्थप्रकरणी क्रूझ पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडलं. यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला. आता किरण गोसावीच्या खासगी बॉडीगार्डने ही एका व्हायरल व्हिडिओद्वारे धक्कादायक माहिती दिली आहे. या प्रकरणात लाखोंची डील झाल्याचा दावा गोसावीच्या खासगी बॉडीगार्डने केला आहे. क्रूझवरील छाप्यावेळी 2 ऑक्टोबरला काय घडलं. त्यावेळी आपणही किरण गोसावीसोबत होतो, आसा दावाही त्याने केला आहे. प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक 1 चा साक्षीदार आहे.
आर्यन खान अटक (Aryan Khan) प्रकरणाला आज धक्कादायक वळण मिळाले. या प्रकरणातील एका पंचाने आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावर पुन्हा एकदा एनसीबीला (ncb) खुलासा करावा लागला आहे. समिर वानखेडे (sameer wankhede) यांनी पंच प्रभाकर साईलचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
एनसीबीने एक पत्र प्रसिद्ध करून प्रभाकर साईलच्या आरोपावर खुलासा केला आहे. प्रभाकर साईल हा या प्रकरणातला साक्षीदार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बोलणे योग्य नाही. त्याला जर या प्रकरणाची आणखी काही माहिती असेल तर न्यायालयात द्यावी, असा खुलासा एनसीबीचे डीडीजी अशोक जैन यांनी केला आहे.
साईल याने गोसावीचे चोरून लपून व्हिडीओ शूट केले. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावलं असं दिसतंय. याच 25 कोटींची मागणी केली. त्यावर 18 कोटींवर डील झाली आणि मी ऐकलं त्यानुसार वानखेडेंना 8 कोटी द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं, असा दावा देखील साईलनं केला आहे.