शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चिंता वाढणार; शिवसेनेचे 2 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार?

0

मुंबई,दि.28: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे 2 आमदार शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीयपणे राज्यभरात दौरे करताना दिसत आहेत. मात्र, यातच आता शिवसेनेतून आणखी दोन आमदार फुटणार असून, लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा शिंदे गटातील मंत्र्यांनी केला आहे. 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर सतत पडझड सुरु असलेल्या शिवसेनेला आणखी दोन हादरे बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी लवकरच शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. तसे घडल्यास हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो. अगदी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले कोणते दोन शिलेदार त्यांची साथ सोडणार, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

संदीपान भुमरे यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. भुमरे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात असल्याचे भुमरे यांनी सांगितले. भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. हाच धागा पकडत संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. पैठणच्या बिडकीन गावात आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या सभेपेक्षा गारुड्याच्या खेळाला जास्त गर्दी होते, अशी खोचक टिप्पणी संदीपान भुमरे यांनी केली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here