सोलापूर,दि.३१: तुम्हालाही सतत येणाऱ्या अज्ञात (Unknown) कॉल्स, क्रेडिट कार्ड किंवा लोनच्या जाहिराती आणि बनावट स्पॅम कॉल्सचा त्रास होतो का? जर उत्तर ‘हो’ असेल, तर देशभरातील सर्व मोबाईल युजर्ससाठी १ नोव्हेंबरपासून अत्यंत दिलासादायक बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) पुढाकाराने १ नोव्हेंबरपासून टेलिकॉम क्षेत्रात CNAP (Calling Name Presentation) ही सर्विस टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे.
या नवीन सुविधेमुळे कॉलिंगचा संपूर्ण अनुभव बदलणार असून कॉलर आयडी पाहण्याची पद्धत कायमची बदलणार आहे.
CNAP (Calling Name Presentation) तंत्रज्ञान नेमके काय आहे?
सध्याच्या घडीला जेव्हा एखाद्या अनोळखी क्रमांकावरून (Unknown Number) फोन येतो, तेव्हा फोनच्या स्क्रीनवर फक्त १० अंकी नंबर दिसतो. समोरची व्यक्ती कोण आहे हे ओळखण्यासाठी बहुतांश नागरिक Truecaller सारख्या थर्ड-पार्टी अॅप्सचा वापर करतात. मात्र, या अॅप्सवर दिसणारी नावे अनेकदा युजर्सनी स्वतः किंवा इतरांनी सेव्ह केलेली असतात; ज्यामुळे ती खरीच असतील असे नाही.
CNAP कसे काम करणार?
केवायसी (KYC) वर आधारित खरी ओळख: CNAP ही सुविधा थेट टेलिकॉम ऑपरेटर्सच्या (Jio, Airtel, Vi, BSNL) नेटवर्क लेव्हलवर काम करेल.
एखादी व्यक्ती जेव्हा सिम कार्ड खरेदी करते, तेव्हा ती आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्राद्वारे केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करते.
१ नोव्हेंबरपासून ही सर्विस लागू झाल्यावर, जेव्हा कोणी तुम्हाला कॉल करेल, तेव्हा त्याच्या सिमच्या अधिकृत केवायसीमध्ये जे मूळ नाव नोंदवलेले आहे, तेच थेट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर फ्लॅश होईल.
युजर्ससाठी हे तंत्रज्ञान का ठरणार गेम-चेंजर?
१. थर्ड-पार्टी अॅप्सची गरज उरणार नाही:
आता मोबाईलमध्ये Truecaller किंवा इतर कॉलर आयडी अॅप्स डाउनलोड करून ठेवण्याची अजिबात गरज उरणार नाही. यामुळे मोबाईलची मेमरी आणि बॅटरीचीही बचत होईल.
२. डिजिटल फ्रॉड आणि सायबर गुन्ह्यांना आळा:
सध्या सायबर भामटे किंवा डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणारे लोक बनावट नावे सांगून लोकांना भीती दाखवतात. CNAP मुळे कॉलरचे अधिकृत नावच स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणणार आहेत आणि फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल.
३. स्पॅम आणि टेलिमार्केटिंग कॉल्सचा थेट बंदोबस्त:
बँका, इन्शुरन्स कंपन्या किंवा रिअल इस्टेटच्या नावाने दिवसभरात अनेक स्पॅम कॉल्स येतात. CNAP मुळे कॉल करणाऱ्या एजन्सी किंवा व्यक्तीचे मूळ नाव आधीच समजल्यामुळे तो कॉल उचलायचा की नाही, याचा निर्णय युजर त्वरित घेऊ शकतील.
४. स्मार्टफोन आणि फीचर (कीपॅड) फोन दोघांवरही उपलब्ध:
थर्ड-पार्टी अॅप्स फक्त स्मार्टफोनवर चालतात. परंतु CNAP ही नेटवर्क-बेस्ड सर्व्हिस असल्यामुळे साध्या कीपॅड (Feature) फोन वापरणाऱ्या युजर्सनाही कॉलरचे नाव थेट स्क्रीनवर पाहता येणार आहे.
युजर्सना यासाठी काय करावे लागेल?
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपल्या फोनमध्ये कोणतेही अतिरिक्त अॅप इन्स्टॉल करण्याची किंवा टेलिकॉम कंपनीकडे वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. टेलिकॉम कंपन्या १ नोव्हेंबरपासून आपापल्या नेटवर्कवरून ही सुविधा टप्प्याटप्प्याने रोल-आउट (Roll-out) करत आहेत.








