सोलापूर,दि.१५: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी युवकास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यात आरोपी ज्ञानेश्वर परमेश्वर होळंबे, रा. बीड यास अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी रुपये ५०,००० च्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला.
यात हकिकत अशी की, दिनांक १३/१०/२०२३ रोजी फिर्यादीने त्यांच्या मुलीचे अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार संबंधित पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
नंतर पोलीस तपासामध्ये असे निष्पन्न झाले कि, यातील आरोपी ज्ञानेश्वर परमेश्वर होळंबे, रा. बीड तरुणाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून व लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे समजले आणि आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध प्रस्थापित केले.
त्यानुसार पोलीसांनी सदर पिडीतेचा कसुन शोध घेतला असता त्यांना सदर पीडिता व आरोपी हे मेंढाली नरसापूर तालुका मालूर, बेंगळुरू येथे एकत्रितरित्या राहत असल्याचा सुगावा लागला. त्याप्रमाणे पोलीसानी सदर पीडीता व आरोपीस बेंगळुरू येथून ताब्यात घेतले.
यातील आरोपी ज्ञानेश्वर परमेश्वर होळंबे याने जामीन मिळण्याकामी अॅड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापुर येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला.
यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर पीडितेचे वय पाहता तिस फूस लावण्याचा संबंध येत नाही. तसेच सदर आरोपी व पिडीतेचा एकत्रित सोलापुर ते बेंगळुरू हा प्रवास पाहता पिडीतेचे अपहरण केले होते, असे म्हणता येणार नाही. सदरचा प्रकार निव्वळ प्रेम संबंधातून झालेला आहे. असा युक्तीवाद आरोपीतर्फे करण्यात आला. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश यांनी आरोपी ज्ञानेश्वर परमेश्वर होळंबे, रा. बीड याची जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. सानप, अॅड. संतोष आवळे, अॅड. राम शिंदे, अॅड. फैय्याज शेख, अॅड. सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.