औरंगाबामध्ये ९ मेपर्यंत जमावबंदीचे पोलिसांचे आदेश, राज ठाकरेंची सभा रद्द होणार?

0

औरंगाबाद,दि.२६: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद येथे १ मे रोजी सभा आयोजित केली होती. मनसेच्या सभेला प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिली नसल्याने संभ्रम कायम आहे. मनसे नेते मात्र मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यावर ठाम आहेत. अशातच आता पोलिसांनी पुढील १३ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश प्रसिद्ध केले आहेत. ९ मे पर्यंत ही जमावबंदी कायम असणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची नियोजित सभा होणार काही नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची सभा होणार असताना पोलिसांनी औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश प्रसिद्ध केला आहे. सणवार तसंच विविध आंदोलनांची कारणं देत पोलिसांनी ही जमावबंदी लागू केली आहे. आदेशामध्ये मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्यासंबंधी दिलेल्या इशाऱ्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे पोलिसांनी परवानगी दिल्याशिवाय मनसे सभा घेऊ शकत नाही हे स्पष्ट आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना महाराष्ट्र दिनी अनेक पक्षांच्या सभा होत असतात आणि जर त्यांना परवानगी दिली जात असेल तर आम्हालाही परवानगी द्यावी लागेल. परवानगी मिळेल अशी खात्री असून त्यानुसार १०० टक्के सभा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच पोलिसांकडे मैदानासाठी संबंधित अर्ज दिला असून दोन दिवसात त्याबाबत निर्णय होईल असंही ते म्हणाले आहेत. परवानगी नाकारली जाईल तेव्हा यावर बोलू असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.

सभेचा टीझर प्रसिद्ध

मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध कऱण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला टीझर शेअऱ केला आहे. मनसेने टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला असून चलो संभाजीनगर अशी घोषणा दिली आहे. या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राज ठाकरे आपण धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचं सांगत आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज यांची सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेसाठी एका लाखांहून अधिक लोक जमतील अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here