मुंबई,दि.19: महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकतेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अनेक काँग्रेस आमदारही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्यात. अशोक चव्हाणांनंतर जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्यात. राजकारणात काहीही होऊ शकते, असे बोलले जात आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजकारणात काहीही होऊ शकते अशी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मोदींना साथ देण्यासाठी कुणीही येऊ शकतं असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय.
भाजपा आमदार नितेश राणे यांच्या एका विधानामुळे विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अकोल्यात नितेश राणेंच्या सभेनंतर वडेट्टीवारांनी टीका केली होती. आपल्या ट्विटमध्ये वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा. पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा ? असे सवाल वडेट्टीवर यांनी उपस्थित केले होते.
वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे. ‘कोणी केला महिलेंचा अपमान ? हिंदू भगिनी ना love जिहाद च्या नावाने फसवले जाते तेव्हा तुम्ही कधी बोलताना दिसत नाही.. विरोधी पक्ष नेता हा फक्त एका धर्माच्या बाजुने बोलणारा नसतो..हे लक्षात असून दे.. MVA च्या काळात पोलिसांकडून वसुली करताना तुमच्या सरकारला पोलीसांची काळजी वाटली नाही का ? असो.. आपण original हिंदुत्वादी आहात..आणि आमचे जुने सहकारी पण..
काय माहीत तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल.. म्हणुन.. इथेच थांबतो ! जय श्री राम’ असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे वडेट्टीवार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली.