निवडणुका नसताना उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं? : राज ठाकरे

0

पुणे, दि.२१: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करत भाषणाला सुरुवात केली. सध्या पावसाचं वातावरण, निवडणुका नसताना उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं? असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील सभेस सुरुवात केली.

ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली, असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून आराखडा आखला गेला. मी एकाच गोष्टीचा विचार केला. मी अयोध्येला जाणार, याचा जो विचार मनात होता.. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं आलंच. पण मला वाटतं तुमच्यापैकी अनेकजण तेव्हा जन्मालाही आले नसतील. तेव्हा आजच्यासारखे चॅनल्स नव्हते. तेव्हा फक्त दूरदर्शन हे एकच चॅनल होतं. तेव्हा दूरदर्शनवर न्यूज रील्स चालवायचे. मला आजही आठवतं जेव्हा मुलायमसिंह सरकार उत्तर प्रदेशात होतं, भारतातून सर्व ठिकाणाहून कारसेवक अयोध्येला गेले, तेव्हा आपल्या सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं. त्या सर्व कारसेवकांची प्रेतं शरयू नदीत तरंगताना मी पाहिली होती, असे राज ठाकरे म्हणाले.

मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतंच, पण जिथे माझे कारसेवक मारले गेले, त्या जागेचंही दर्शन मला घ्यायचं होतं. राजकारणात भावना अनेकांना समजत नसतात. असो. पण ज्या प्रकारचा माहौल तिथे उभा केला जात होता…मी उद्या जर तिथे जायचं ठरवलंच असतं, तर महाराष्ट्रातून अनेक बांधव तिथे आले असते. तिथे जर काही झालं असतं, तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, जेलमध्ये सडवलं गेलं असतं आणि हकनाक काही कारण नसताना तो ससेमिरा तुमच्या पाठिशी लावला असता. म्हटलं मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर देखील केसेस टाकल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळी इथे कुणीच नसतं. हा सगळा सापळा होता. असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, आत्ता जाग आली? राज ठाकरेंनी माफी मागावी वगैरे? १२-१४ वर्षांनी आठवण आली का? तेव्हा ही माणसं कुठे होती? यातून चुकीचे पायंडे पडतायत हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणे राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय पाय ठेऊ देणार नाही. विषय माफी मागण्याचाच आहे, तर गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाचे सदस्य आहेत. गुजरातमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिथल्या उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांना मारलं, एका रात्रीत १०-१५ हजार बिहारी, उत्तर प्रदेशवाल्यांना हाकलून लावण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार आहे?

गुजरातमध्ये कुणाला माफी मागायला लावणार आहात? हे अचानक आत्ता कसं सुरू झालं? ज्यांना आपलं हिंदुत्व, लाऊडस्पीकर झोंबले, आपल्याविरोधात सगळे एकत्र येतात. अन्यथा भांडत असतात. मी म्हटलं जर मशिदीवर बांग जोरात लागली तर त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावा. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे का? त्यांना अटक केली. मधु इथे आणि चंद्र तिथे असे अटक झाले. नंतर त्यांना सोडण्यात आलं. शिवसेनेकडून त्यांना वाट्टेल ते बोललं गेलं. एवढा राडा झाल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही?

औरंगजेब कबर

मला वाटलं औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमचा माणूस गेल्यावर महाराष्ट्र खवळेल. पण महाराष्ट्र थंडच. ज्याचा कोथळा शिवछत्रपती बाहेर काढतात. त्याची एवढीशी कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बघून या. त्याचा विस्तार आज १५ ते २० हजार फुटात झालाय. अफजलखानाची मशीद तिथे उभी राहिली आहे. त्यासाठी फंडिंग येतंय. हे फंडिंग देणाऱ्या अवलादी कोण आहेत? कारण आम्ही शांत बसलो आहोत. आम्हाला कसलंही देणं-घेणं नाहीये. आम्ही लोण्याचे थंड गोळे आहोत. असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, भोंग्यांचा विषय आपण काढला, तेव्हा भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या. जवळपास ९२ ते ९४ टक्के ठिकाणी आवाज कमी झाले. माझी मागणी लाऊडस्पीकरच निघण्याची आहे. पण तुम्ही जोपर्यंत असे वेंधळ्यासारखे राहणार, तोपर्यंत ही माणसं अशीच घुसत राहणार.

राज ठाकरे म्हणाले, या थंड बसण्यामध्ये, काहीही न करण्यामध्ये या देशावर ९०० वर्ष परकीयांनी सत्ता गाजवली. मधला सव्वाशे वर्षाचा इतिहास बाजूला काढला तर ९०० वर्ष हा देश पारतंत्र्यात होता. गजनीचा मोहंमद आल्यापासून आत्तापर्यंत. १९४७ साली ही भूमी स्वतंत्र झाली. ही मंडळी आत आली कशी? कारण आम्ही बेसावध होतो.

भोंग्यांचं आंदोलन एका दिवसाचं नाही. या गोष्टीला सातत्य नसेल, तर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला तपासत आहेत. हे विसरले, की हळूहळू आवाज वर यायला सुरू होणार. आत्ता सुरू केलंय ना, एकदाचा तुकडा पाडून टाका.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here