मुंबई,दि.२७: पहाटे साडेतीन वाजता पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतिप्रिया मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घरातून ईडीचे अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान त्यांना कोलकात्यातील सीजीओ कॉम्प्लेक्समधल्या ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले. याआधी मलिक यांची तब्बल २० तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. रेशनिंग घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, या सर्व घडामोडींमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणातील हालचाली वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
मध्यरात्रीनंतर नेमकं काय घडलं?
गेल्या २० तासांपासून ईडीचे अधिकारी ज्येतिप्रिया मलिक यांच्या घरी ठाण मांडून बसले होते. रेशन घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला आहे. वनमंत्रीपदाच्या आधी मलिक यांच्याकडे अन्न पुरवठा मंत्रालयाचा कारभार होता. त्यावेळी त्यांनी रेशनिंग धान्य पुरवठ्यामध्ये घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला असून त्याअनुषंगाने त्यांची खोल चौकशी चालू होती. मलिक यांचे व्यावसायिक बकिबुर रेहमान यांच्याशीही संबंध होते का? याचा तपास ईडी करत आहे. रेहमान यांना नुकतीच या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मोठा कट असल्याचा आरोप
दरम्यान, अटकेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ज्योतिप्रिया मलिक यांनी हा मोठा कट असल्याचा दावा केला आहे. “मला एका मोठ्या कटामध्ये जाणूनबुजून अडकवलं जात आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी ईडीचे अधिकारी त्यांना अटक करून घेऊन जात असताना माध्यमांना दिली.
ज्योतिप्रिया मलिक हे पश्चिम बंगालचे अन्न पुरवठा मंत्री असताना त्यांनी रेशनिंग धान्य पुरवठ्यामध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. त्यासंदर्भात ईडीने गेल्या दोन दिवसांत मलिक यांच्या राहत्या घरासह त्यांच्या सहकाऱ्यांच्याही मिळून एकूण ८ घरांवर छापे टाकले.
गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ईडीचे अधिकारी ज्योतिप्रिया मलिक यांच्या सॉल्ट लेक परिसरातील घरी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या घराची झडती आणि मलिक यांची चौकशी चालू होती. मलिक यांचे स्वीय सचिव अमित डे यांच्या नगरबझारमधील घरीही ईडीनं छापा टाकला. याआधी ईडीनं रेहमान यांच्या घरी टाकलेला छापा तब्बल ५३ तास चालला होता. ईडीच्या माहितीनुसार या छाप्यात सरकारी कार्यालयाच्या स्टॅम्पसह तब्बल १०० महत्त्वाची कादगपत्रं त्यांच्या घरी सापडली आहेत.