मुंबई,दि.३०: शिवसेना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी सत्तेसाठी आपला वापर होतोय असं वाटल्यानंतर त्याच क्षणी लाथ मारून बाहेर पडणारी आम्ही स्वाभिमानी महाराष्ट्राची लोक आहोत, असं विधान केलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही दाखल दिला. तसेच हिंदुत्वाचा अपमान होतोय हे लक्षात आल्यावर आम्ही बाहेर पडल्याचं सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “आम्ही कोणाला वापरू देत नाही. ज्या क्षणी आम्हाला वाटलं की आमचा वापर होतो, त्याच क्षणी लाथ मारून बाहेर पडणारी आम्ही स्वाभिमानी महाराष्ट्राची लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने स्वाभिमानासाठी औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर पडले, त्याच पद्धतीने शिवसेनेचा हिंदुत्वाचा अपमान होतोय हे लक्षात आल्यावर आम्ही बाहेर पडलो. आज शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे.”
भैय्या नावाचा केक
“व्यापक चर्चा होऊ दे. त्यांनी हिंदुत्वाचा कातळ पांघरलेला आहे. ते १९९२ दंगल विसरले का? यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान केले. अयोध्यामध्ये केलेला शिवसेनेचा त्याग ते विसरले का? मला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही. ते आमच्या रक्तामध्ये आहे. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये, तुम्ही अडचणीत याल. कोणाच्या वाढदिवसाला भैय्या नावाचा केक कापत होते हे जरा आठवा,” असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला.
हनुमान भगवान नहीं
संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांची चिंता करण्याची गरज नाही. काही लोक या देशामध्ये दंगे घडवून विभाजन करण्याचा डाव करत आहेत. त्यांच्या विरोधात देखील शिवसेना लढत आहे. सन्मानीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान विरुद्ध केलेले उद्गार काय आहेत, हनुमान एक दलित व्यक्ती आहे. ‘हनुमान भगवान नहीं हैं, हनुमान एक जंगली वानर है’ असे वक्तव्य करणारे आम्हाला हनुमान चालीसाविषयी सांगतात.”