पुणे,दि.17: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला. “देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे 3 तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ,” असा इशाराच त्यांनी दिला.
मुस्लिमांनाही भोंग्याचा त्रास
राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, “इथे पत्रकार परिषदेत एक मुस्लिम पत्रकार आले आहेत, ते आमच्या बाळा नांदगावकर यांना भेटले. त्यांनी सांगितलं की, नुकतंच मला लहान मूलं झालं, भोंग्याच्या आवाजामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर मी मशिदीत जाऊन भोंगा बंद करण्यास सांगितलं. यावरुन दिसून येतं की, भोंग्याचा त्रास फक्त हिंदुनांच नाही, तर मुस्लिमांनाही होतोय.”
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. पुणे येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले की, भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे. एका मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितले की त्यांचे बाळ लहान असताना त्यांना भोंग्याचा त्रास झाला. त्यांनी स्वतः मशिदीत जाऊन भोंगा बंद करायला सांगितले. भोंग्याच्या आवाजाचा त्रास हा हिंदूनाच नाही तर मुस्लिमांनादेखील होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी आपल्या आगामी जाहीर सभेची माहिती या पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र दिनी, एक मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी दिली.
प्रार्थनेला विरोध नाही
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील,” असेही राज ठाकरे म्हणाले.