कोल्हापूर,दि.14: विशाल मोरे यांनी रस्त्यात सापडलेले 10 तोळे सोने प्रामाणिकपणे परत केल्याने विशाल मोरे व त्यांच्या पत्नीचे सर्वत्र कौतुक होत आहे. महागाई वाढली असताना रस्त्यावर सापडलेले अंदाजे तब्बल साडेचार लाखांचे सोने परत केल्याने माणुसकीचे दर्शन घडले आहे. या धावपळीच्या जगात पैशासाठी माणूस प्रमाणिक पणा विसरत चालला आहे. चोऱ्या मारामाऱ्या, आयते मिळालेले पैसे या पाठीमागे लागण्याच्या नादात प्रामाणिक पणाही कमी होत चालला आहे.
परंतु कोल्हापूर जिल्ह्यात माणुसकीचे दर्शन घडल्याचे दिसून आले आहे. बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने निवृत्त शिक्षक सोने तारण ठेवून कर्ज भरण्यासाठी जात असताना घाईत ते सोने पडले. तब्बल 10 तोळे सोने असलेला एक रुमाल कोल्हापुरातील एकाला मिळाला. ज्या व्यक्तीला हे सोने मिळाले ते सोने त्याने प्रामाणिकपणे परत केल्याने याची जोरदार चर्चा होत आहे.
रस्त्यात पडलेले दहा तोळ्यांचे दागिने परत देत कोल्हापूरच्या विशाल मोरे यानी प्रामाणिकपणा जपलाय. राधानगरी रोडवर फिरायला गेल्यानंतर त्यांना एका रुमालात लक्ष्मीहार, दोन नेकलेस,एक ब्रेसलेट असे दहा तोळ्यांचे दागिने मिळाले होते. त्या साहित्यात मिळालेल्या आधार कार्डवरून त्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
तर तिकडे दागिने हरवल्याने घालमेल झालेल्या तानाजी देसाई यांनी पोलिसांत धाव घेतली होती. मात्र त्यांना दागिने सापडल्याचे समजताच जीवात जीव आला. बँकेच्या कामासाठी जमवलेली पुंजी हरवल्याने भेदरलेल्या देसाई यांना कोल्हापूरच्या प्रमाणिकपणाचा प्रत्यय आला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.
कोल्हापुरातील नवीन वाशी नाका येथे राहणाऱ्या तानाजी भिवाजी देसाई (वय 62) हे निवृत्त शिक्षक आहेत. बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा मासिक हप्ता थकल्याने देसाई कुटुंब चिंतेत होते. त्यांनी घरातील 10 तोळे दागिने बँकेत तारण ठेवून त्यावर कर्ज काढण्याचा निर्णय घेतला. दोन प्रतिज्ञापत्रे व 10 तोळ्यांचे दागिने रूमालात बाधून हा ऐवज दुचाकीच्या डिकीत ठेवला होता.
तानाजी देसाई हे जिवबानाना पार्क येथील रस्त्यावरून वाहनाने गडबडीत जात असताना डिकीतील दागिने व प्रतिज्ञापत्र एमएसईबी रोडवर पडले. काही वेळाने पोर्ले येथील तरुण व्यावसायिक विशाल तानाजी मोरे (वय 35) यांना या वस्तू बेवारस स्थितीत आढळून आल्या.
दरम्यान विशाल यांनी यांनी रूमाल उचलल्यानंतर त्यामध्ये काय आहे पाहण्यासाठी त्यांनी गाठ सोडली यानंतर दोन मोतीहार, दोन गंठण, ब्रेसलेट असा 10 तोळ्याचा ऐवज आढळला. मोरे यांनी पत्नी हर्षदा यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. हर्षदा स्वत: घटनास्थळी दाखल झाल्या. प्रतिज्ञापत्रावरील नाव आणि मोबाईल क्रमांकांवरून देसाई यांचे निष्पन्न झाले. मोरे यांनी चार ते पाचवेळा देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळत नव्हता.
मोरे दाम्पत्य करवीर पोलिस ठाण्यात दाखल झाले. प्रभारी अधिकारी सूरज बनसोडे, विक्रम चव्हाण, हवालदार दत्तात्रय बांगर, सुनील देसाई यांच्याशी त्यांनी संपर्क केला. दाम्पत्यांच्या प्रामाणिकपणावर अधिकारी, पोलिस खूश झाले. त्यांनी पती-पत्नीचे कौतुक करून जिवबा नाना पार्क परिसरात सायंकाळी दवंडीही दिली. त्यानंतर देसाई भेदरलेल्या स्थितीत पोलिस ठाण्यात आले.