वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

0

मुंबई,दि.१५: ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच ‘वेदान्त’ कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील १ लाख नोकऱ्या बुडाल्या असा आरोप विरोधकांकडून करत सत्ताधाऱ्यांची कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु याच आरोप-प्रत्यारोपात वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांताचे आभार मानत विरोधकांना टोला लगावला आहे. 

अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रात्री सव्वादहाच्या आसपास अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली. चार वेगवेगळ्या पोस्ट करताना त्यांनी गुजरातची निवड केल्याचं सांगतानाच लवकरच या प्रकल्पाअंतर्गत भारतभर उद्योगांचं जाळं पसरवण्याचा विचार असल्याचं सांगितलं.

वेदांता-फॉक्सकॉन बहु-अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकरित्या साइटचे मूल्यांकन करत आहे. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे ज्याला अनेक वर्षे लागतात. आम्ही याची सुरुवात सुमारे २ वर्षांपूर्वी केली होती. आमचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या अंतर्गत आणि बाह्य व्यावसायिक एजन्सीच्या टीमने काही राज्ये उदा. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू इ. गेल्या २ वर्षांपासून आम्ही या प्रत्येक सरकारशी तसेच केंद्र सरकारशी चर्चा करत आहोत आणि आम्हाला त्यांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे.

“आमच्या कंपनी अंतर्गत तसेच इतर संस्थांच्या मदतीने केलेल्या पहाणीनंतर काही राज्यांची नावं पर्याय म्हणून निश्चित करण्यात आली. त्यामध्ये गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूचा समावेस होता. आमचं उद्देश साध्य करण्यासाठी ही राज्यं योग्य असतील असा निष्कर्ष निघाला. मागील दोन वर्षांपासून आम्ही या राज्यांमधील सरकारांबरोबरच केंद्र सरकारच्या संपर्कात असून आम्हाला त्यांनी उत्तम पाठिंबा दिला आहे,” असंही अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

लवकरच महाराष्ट्रातही गुंतवणूक करणार असल्याचं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. ते लिहितात, “कोट्यवधी रुपयांची ही दीर्घकालीन गुंतवणूक असून यामुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची दशा आणि दिशा बदलणार आहे. आम्ही देशभरामध्ये परिसंस्था उभारणार आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्यास कटीबद्ध आहोत. गुजरातपासून सुरु झालेल्या या प्रवासामध्ये देशभरात विस्तार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे.”

महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे अशी घोषणा अग्रवाल यांनी केली असली तरी ती नेमकी किती आणि कशी केली जाणार आहे हे मात्र सध्या गुलदस्त्यातच आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here