लखनऊ,दि.17: UP News: एक दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीत पडून 13 महिलांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. लग्नाचं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदललं. या घटनेत एका विहिरीत अनेक महिला आणि मुली कोसळल्या. या घटनेत 13 महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे (13 Women Drowned in Well). ही घटना उत्तर प्रदेशच्या कुशीनगर (Kushinagar) येथील असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न होतं. लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. काही महिला आणि मुली एका विहिरीच्या जाळीवर उभा होत्या. अचानक त्यांच्या वजनाने जाळी तुटली आणि त्यावर उभा असलेल्या सर्व महिला आणि मुली विहिरीत कोसळल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौरंगिया ग्रामसभेच्या स्कूल टोलावर बुधवारी रात्री सुमारे 9 वाजता एका लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान विहिरीची पुजा करण्याच्या प्रथेसाठी महिला आणि मुली एकत्र जमल्या होत्या. विहीर पाण्याने भरलेली होती. गर्दी भरपूर होती. विहिरीच्या जवळ आणि विहिरीवर बांधलेल्या मचाणावर मुली व महिला बसल्या होत्या. मात्र हे मचाण कमकुवत झाल्याने ते तुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. त्यांना वाचवण्याच्या नादात इतरही अनेक महिला विहिरीत बुडाल्या. या घटनेचा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून समजतं की लोक शिडी टाकून विहिरीत उतरले आणि मदतकार्य सुरू केलं. रात्र असल्यानं बचावकार्यात अडचणी येत होत्या, टॉर्चच्या उजेडात काम करावं लागत होतं.