मुंबई, दि.२०: शिवसेना कार्याध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या (Shivsena) शिवसंपर्क अभियानासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यांनी भारतीय जनता पार्टीवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. “दुसऱ्यांनी खाल्लं तर शेण आणि आम्ही खाल्लं तर श्रीखंड हा प्रकारही लोकांच्या नजरेत आणला पाहिजे. यांचे नुसते जबाब घेतले तर तळपायाची आग मस्तकात जाते. लगेच लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करतात,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
एमआयएम (MIM) पक्षाने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा कट असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. बुडाखाली सत्ता हवी असून ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
“अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“पूर्वी इस्लाम खतरे मे है म्हणायचे, आता हिंदू खतरे मे अशी नवीन बांग त्यांची सुरु आहे. दरवेळी अनामिक भीती दाखवायची. इतिहासाच्या खपला काढल्या जात असून हा डाव मोडून काढला पाहिजे,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, “अधिवेशनाच्या आधी भुजबळांनी त्यांच्या घऱी सर्वांना जेवायला बोलावलं होतं. त्यावेळी यावर चर्चा झाली असता भाजपात आणि आपल्यात खोटं बोलू शकत नाही हा मुख्य फरक असल्याचं मी सांगितलं. खरं बोलणं हा अवगुण ठरत आहे पण खोटं बोलून जिंकावं लागत असेल तर त्यासारखं दुर्दैव नाही. जर भाजपा अशाच पद्दतीने लढत जिंकत राहिला तर सत्यमेव जयतेच्या जागी असत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य ठेवावं लागेल”, अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
“शिवसेना मुस्लीमधार्जिणी झाल्याचं म्हणत आहेत. मी काही मोहन भागवत यांची वाक्यं घेऊन बसलो आहेत. जर मला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात? मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का? आधी हिंदुत्व काय ते समजून घ्या,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तुमची सत्तेची स्वप्नं आम्ही चिरडून टाकली म्हणुन आम्ही मुस्लीमधार्जिणी असू तर मोहन भागवतांनी काय सांगितलं आहे ते ऐका असं सांगत उद्धव ठाकरेंनी त्यांची काही वक्तव्यं वाचून दाखवली. तसंच आरएसएसला मुस्लीम संघ की राष्ट्रीय मुस्लीम म्हणायचं का? असंही त्यांनी विचारलं.